श्री क्षेत्र तुळजापूर माहिती #Shri Kshetra Tuljapur Mahiti
श्री क्षेत्र तुळजापूर माहिती
तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो.
श्री स्कन्द पुराणात या देवीची अवतार कथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते. कृत युगात कर्दम ऋषींच्या मृत्यू नंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करण्याचे ठरविले. परंतु तिला लहान मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातली अल्पवयी मुलासाठी तिने तो बेत रद्द केला व मंदाकिनी नदीच्या तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकर नावाच्या दैत्याने तिचे पतिव्रत्य व तप भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीचे विनंतीवरून यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव केले. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा तुळजा या नावाने ती ओळखली जाऊ लागली.
तुळजाभवानी मंदिर हे दंडाकारण्य वनक्षेत्र या महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक स्थळी वसलेले असून, येथील यमुना नावाच्या डोंगरावर हे मंदिर आहे. तुळजापूरच्या मंदिर मधील मूर्ती ही चल स्वरूपातील असून, ती वर्षभर आपली जागा बदलत असते. प्रत्येक वर्षी तीन वेळा या मूर्तीला मंदिरा बाहेर घेतले जाते. ते तीन दिवस अतिशय विशेष असतात. त्यानंतर बाहेरून या मूर्तीला मंदिराची प्रदक्षिणा केेली जाते, आणि पुन्हा मंदिरामध्ये आणली जाते. या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री यंत्रावर केलेली आहे, असे देखील सांगितले जाते. जे कार्य आदि शंकराचार्य यांनी केले होते.
तुळजाभवानीची मूर्ती गंडकी शिळेची आणि अती प्राचीन आहे. ती देवी अष्टभूजा असून ती महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. तिच्या मुकुटावर शिवलिंग आहे. तिच्या उजव्या बाजूला सिंह असून डावीकडे तपस्विनी अनुभूती उलटे टांगून घेऊन तपःश्चर्या करत आहेत. विशेष म्हणजे त्या मूर्तीवर मार्कण्डेय ऋषी पुराण सांगत असलेली ‘कथा’ कोरलेली आहे. तिचा उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे. तिच्या मस्तकी मोत्याचा तुरा आहे. भवानी मातेच्या डाव्या खांद्यावर चंद्र आणि उजव्या खांद्यावर सूर्य आहे. तिच्या आठही हातात वेगवेगळी आयुधे आहेत. तिने डाव्या हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे. तर उजव्या हातातील त्रिशूल महिषासूराच्या बरगडीत खुपसला आहे. तिचे ते महिषासुरमर्दिनीचे महा तेजोमयी रूप पाहता-पाहता पाहणाऱ्याचे भान हरपून जाते! तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे.
तुळजाभवानीची सिंहासनपूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. प्राचीन काळापासून सकाळी व सायंकाळी दोन्हीवेळ ती पूजा केली जाते. शिवाय तिची रोज सायंकाळी ‘प्रक्षाळ पूजा’पण असते. देवीचे सायंकाळचे अभिषेक पूजन झाल्यानंतर देवीसमोर विड्याच्या पानाचे (सुमारे दोन हजार विड्यांच्या पानांचे) घर लावतात. प्रक्षाळ पूजेच्या वेळी पंचखाद्याचा नैवेद्य दाखवतात. देवीची गाणी गातात. तुळजाभवानी मंदिरात हळदी-कुंकवाचा सडा घालतात, होमकुंडात हवन करतात. तिची नित्यनेमाने रोज विविध प्रकारे पूजा होते. तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव म्हणजे महापर्वणीच! महादुर्गाष्टमीला हवन-पूर्णाहुती होते.
तुळजाभवानीच्या त्या नवरात्रोत्सवात लाखो भक्तांचा उदंड उत्साह तिच्या पालखी सोहळ्यात तर शिगेला पोचतो. चल असलेली तुळजामातेची मूर्ती तशी वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरुन हलवली जाते. ती भाद्रपद वद्य अष्टमीला नवरात्रापूर्वी प्रथम हलवण्यात येते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस पुन्हा ती सिंहासनारूढ होते. विजयादशमीला ती सीमोल्लंघन करून परतली, की विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ती मंचकी निद्रेत असते. तशीच ती पौष शुद्ध प्रतिपदेपासून पौष शुद्ध अष्टमीपर्यंत शयनगृहात निद्राधीन असते. ते तिचे आगळे वैशिष्ट्य आहे. नवरात्रोत्सवांत भवानीमातेची दोन वेळा अभिषेक पूजा होते. नवरात्रीत भगवती सेवक रात्री भजन भक्तिगीत आळवून जागर घालतात. तुळजापूरला नवरात्र नवमीला अहमदनगर जिल्ह्यातील बुहानगरहून देवीची पालखी आणि भिंगारहून पलंगपालखी येते.
विजयादशमीला पहाटे बुहानगरच्या पालखीने तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केला, की भवानीमातेच्या प्रतिमेला एकशेआठ नऊवारी साड्यांचे दिंड वेष्टन भक्त देतात, तर सीमोल्लंघन करून आल्यावर भवानीमाता भिंगारहून आलेल्या मंचावर निद्रा करतात ती अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत. त्या कालावधीत ज्या पालखीतून तुळजाभवानीची प्रदक्षिणा निघते. ती पालखी होममकुंडात जाळतात आणि तिचा दांडा घेऊन मानकरी परततात. तसेच, बुहानगरहून पालखी घेऊन येणारे तेली कुटुंबीय आणि भगत यांचे वंशज भवानीमातेच्या पलंगास त्यांच्या उजव्या हाताची करंगळी कापून, रक्ताचा टिळा लावून अंतरीचा भक्तिभाव व्यक्त करतात.
देवीच्या नवरात्रात जोगवा मागताना, देवी भक्तांनी कामक्रोधाच्या चिंध्या फाडून त्याचे पोत करून ते पेटवावेत, ते घरोघरी फिरवावेत, त्यावर भक्ताने प्रेमरसाचे तेल टाकावे अशा उदात्तभावाचा तो जोगवा! हातात पोत, गळ्यात कवड्यांच्या माळा, कपड्यांवरही लावलेल्या कवड्या, कपाळाला भस्म, हातात परडी घेऊन मागितलेली भिक्षा म्हणजे जोगवा! प्रत्येक मंगळवारी काही ठिकाणी तसा जोगवा मागण्याची परंपराही आहे.
श्री तुळजाभवानी नित्यपूजा
- दर्शनाचे वेळी किंवा इच्छा झाल्यास भक्त आईची पाद्यपूजा करून ओटी भरण करतात. हि पूजा मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यत कोणत्याही वेळेत करता येते.
- देवीला सकाळी ०६.०० ते १०.०० व सायंकाळी ०७. ते ०९.०० या वेळेत अभिषेक पूजा घालण्यात येते.
- सिंहासन महापूजा हि दही, दुध, श्रीखंड, आंब्याचा रस, उसाचा रस यापैकी ज्याचे त्याचे इच्छेप्रमाणे एका प्रकारात केली जाते. सिंहासन पूजेसाठी ७० लिटर साहित्याचा वापर केला जातो. दररोज सकाळीचे पूजेचे वेळी ०५ व सायंकाळचे पूजेचे वेळी ०२ सिंहासन पूजा करण्यात येतात.
- मुख्य मंदिराचे बाहेरील बाजूस असणारे पोलीस गार्ड समोरील पारावर गोंधळ पूजा केली जाते. गोंधळी देवीची पारंपारिक स्तवने संभळच्या निनादात म्हणतात व हि पूजा केली जाते. हि पूजा मुख्यत्वे नवविवाहित भाविकांकडून केली जाते. गोंधळ पूजा हि कुलाचाराचा एक प्रकार आहे.
- सौभाग्यवाती स्त्री आपले सौभाग्य अबाधित ठेवण्यासाठी व घरी धन, धान्य विपुल प्रमाणात राहावे या प्रार्थनेसह हळदी कुंकू मिश्रित पाण्याचा सडा होमकुंडाचे भोवती टाकते यास कुंकवाचा सडा हा विधी म्हणतात.
- आपल्या घरापासून किंवा श्री क्षेत्री असलेल्या निवासापासून अथवा मंदिराचे होमकुंडापासून कल्लोळ व गोमुख तीर्थात स्नान करून ओल्या कपड्यांसह भाविक साष्टांग दंडवटाद्वारे मंदिरास प्रदक्षिणा मारतात या विधीस दंडवत विधी म्हणतात. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.
- आपल्या मुलाचे, मुलीचे प्रथम केस कर्तन म्हणजेच जावळ कुलदेवतेच्या दरबारात करण्याच्या इच्छेनुसार किंवा नवसपूर्ती नंतर बरेच भाविक मंदिरात असणारे गोंधळी पाराचे खालील बाजूस हा विधी करतात.
- तुळजाभवानी देवीची आराधना करण्यासाठी हि देवी ज्यांची कुलदैवता आहे असे भाविक या ठिकाणी येऊन कवड्यांची माळ व परडी देवीच्या चरणास लाऊन घेतात व मंदिरात पोत पाजळून नैवद्य वगैरे दाखून सदर माळ, परडी व पोत आपल्या गावी घेऊन जातात. व देवघरात ठेऊन त्यांची नित्य पूजा करतात. विशेषतः मंगळवार व पोर्णिमेदिवशी शेजारी असणारे पाच घरात जाऊन देवीच्या नावाने जोगवा मागतात. पूर्वापार प्रथेनुसार हि पूजा एक कुलाचाराचाच प्रकार आहे.
- अनेक भाविक आपल्या स्वतःच्या घरासाठी देवीला पानाचे घर अथवा फुलाचे घर वाहीन असा नवस करतात. नवसपूर्ती झाल्यानंतर हि पूजा करण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथे येतात व हि पूजा बांधतात. सदरची पूजा हि संध्याकाळचे अभिषेक पूजा संपल्यानंतर आरती व धुपारती नंतर बांधली जाते ती दुसऱ्या दिवशी चरणतीर्थापर्यंत ठेवली जाते.
- तुळजापूर क्षेत्र देवीच्या सानिध्यात देवीच्या साक्षीने सर्व सिध्दीयुक्त संस्कार व कुलदैवत आशीर्वाद प्राप्तीसाठी तुळजापूर क्षेत्रात लग्न व मुंज कार्य केले जाते. एखाद्या अडचणीच्या वेळी या ठिकाणी विवाह करण्यास वेळ, काळ, मुहूर्त, नक्षत्र हे पाहण्याची गरज नाही.
- निवासस्थानापासून एक मोठा कणकेचा दिव्यात वात लावून तो दिवा एका छोट्या ताटात ठेवून त्याची विधिवत पूजा करून दीप प्रज्वलित करून सदर ताट डोक्य्यावर ठेवून भाविक मंदिरात येतात व संपूर्ण मंदिरास प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सदरचा दिवा होमाचे मागे विसर्जीत करतात. हा पूजा विधी संकल्पसिद्धीसाठी केला जातो. एखादा संकल्प पूर्ण होणार का याचे शंका निरसन असे आहे कि, सदरचा दिवा संपूर्ण प्रदिक्षिणा पूर्ण होईपर्यंत प्रज्वलित राहीला तर संकल्प पूर्ण होणार अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- लिंब नेसणे ही नवस फेडण्याची एक पद्धत आहे.सामान्यतः शुभकार्यांसाठी लिंब नेसण्याची प्रथा आहे. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.
- याठिकाणी आई भगवतीला भाविकाकडून पुरणपोळी, दहीभाताचे नैवद्य दाखविले जातात. आईच्या पायाखाली असलेल्या महिषासुर या दैत्यास मांसाहारी नैवद्य दाखविला जातो. सकाळी चरणतीर्थाचे वेळी भाजी भाकरी व खीर (पायास) यांचा नैवद्य दाखविला जातो. सकाळीचे व सायंकाळीचे अभिषेक संपल्यानंतर आरती व धुपारती वेळी ज्या भोपे पुजा-याची पाळी आहे त्याच्या घराचा साखर भाताचा व हैद्राबाद संस्थानचा दोन भाज्या, साधी पोळी, वरण, भाताचा नैवद्य आईला दाखविला जातो. प्रक्षाळ पूजेचे वेळी महंत वाकोजी बुवा मठाकडून व हमरोजी बुवा मठाकडून नैवद्य दाखविला जातो.
श्री क्षेत्र तुळजापूर माहिती #Shri Kshetra Tuljapur Mahiti
नवीनतम अपडेटसाठी सबस्क्राइब करा: https://omaadesh.blogspot.com
आमच्या ब्लॉगवरील सर्व लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://omaadesh.blogspot.com/2025/01/blog-post.html
Post a Comment