सहज बोलणे हित उपदेश। करुनि सायास शिकविती ।।
सहज बोलणे हित उपदेश। करुनि सायास शिकविती ।।
आज आपण संत- महात्म्य पर विषयावर बोलणार आहोत ज्यांच्या नुसत्या सहवासाने सर्वसाधारण मनुष्याचे जीवन चंदनासारखे शितल होते ती व्यक्ती म्हणजे संत अशा थोर विभूती आपल्या मुखातून सहज असे शब्द जरी बाहेर काढतात तरी केवळ त्यांच्या त्या सहज बोलण्याने देखील उपदेशच घडत असतो जे नेहमी सत्यधर्माचा सत्य मार्गाचे आचरण करतात त्यांना संत म्हणावे अशा थोर विभूती आपल्या आत्मज्ञानाने सर्वसाधारण जनमानसातील अज्ञानाचा अहंकार दूर करतात
संतांची जीवन शैली, त्यांचे संपूर्ण जीवन हे समाजासाठी आदरणीय व अनुकरणीय असते यात काही शंकाच नाही. संतांच्या अंगी विविध गुण असतात ते म्हणजे त्यांच्या ठायी असणारी ईश्वरनिष्ठा, एकतत्वता, सदाचरण, निरपेक्षता, त्याग, पुण्यशीलता, निष्कामता तसेच सकल समाजाच्या उद्धाराची असलेले आस. संत आपल्या संतत्वाचा अभिमान, अहंकार न बाळगता सर्वांच्या सुख-दुःखात समरस होतात. ते आपल्यात राहून आपल्यासारखेच बोलतात, आपल्या सारखेच दिसतात परंतु त्यांचे वेगळेपणही सतत आपल्याला भासत असते.
संत जे आपल्याशी सहज बोलतात त्यांच्या त्या बोलण्यात देखील आपला उद्धार होत असतो. त्यांच्या सहज मुखातून आलेले शब्द हितोपदेशच ठरत असतो. याचे उदाहरण द्यायचे झाले तर आईसाहेब मुक्ताबाई व चौदाशे वर्ष तपश्चर्या करून कोराच राहिलेला चांगदेव यांचे देता येईल. मुक्ताईच्या मुखातून सहजपणे चांगदेव यांच्या साठी "कोरा" हा शब्द निघाला. तो शब्द ऐकून चांगदेव महाराज मुक्ताई च्या दर्शनासाठी येतात. ज्यावेळी चांगदेव महाराज मुक्ताईच्या दर्शनासाठी येतात त्यावेळी आईसाहेब मुक्ताबाई स्नान करत असतात. ते पाहून चांगदेव तिथून निघून जाण्यासाठी माघारी फिरतात. त्याच वेळी आईसाहेबांचे लक्ष त्यांच्याकडे जाते.
मुक्ताबाई त्यांना विचारतात, चांगदेवा आपण का बरं निघून चाललात येथून? त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणतात, आई साहेब आपण स्त्री आहात आणि आपण स्नान करत आहात त्यामुळे मी इथून चाललोय. हे उत्तर ऐकताच क्षणी आईसाहेब चांगदेवांना सहज बोलल्या की, चांगदेवा तुम्ही अजून स्त्री आणि पुरुष या भेदातच अडकलेले आहात. तुम्हाला माझ्या अंतरात्म्याची ओळख झालेली नाही मग मी तुम्हाला उपदेश तरी कसा करू ? मुक्ताईच्या सहज बोलण्याने चांगदेव महाराज गहिवरून जातात. त्यांच्यातील अहंकार, भेद गळून पडतो. मुक्ताईचे चरण पकडून ते म्हणतात,
"चांगदेव म्हणे आजि जन्मा आलो। गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ।।"
अशाप्रकारे चांगदेवांनी मुक्ताईला शरण जाऊन तिच्या सहज बोलण्यातून आपला उद्धार करून घेतला व त्यांनी सच्चिदानंद पदवी प्राप्त करून जनसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवण्याचा प्रयत्न केला.दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर नारद महर्षी व वाल्या कोळ्याचे देता येईल. वाल्या कोळी म्हणजे पापाचा कळस असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दरोडेखोरी करून व डाका टाकून संपत्ती कमावली त्या संपत्तीसाठी त्याने कित्येक निरपराध जीवांचा बळी घेतला. एक बळी घेतला की त्याच्या नावाने एक खडा रांजनात टाकायचा असे सात रांजण त्याने भरले. एके दिवशी त्याची गाठ महर्षी नारदांशी पडली त्याला नारदांनी खूप समजावले. महर्षी विचारतात, तू हे पाप का आणि कोणासाठी करतोय? तेव्हा वाल्या म्हटला हे सर्व मी माझ्या कुटुंबासाठी करतो. तेव्हा नारदांनी त्याला सांगितले की तू आता येथून घरी जा आणि तुझ्या कुटुंबातील व्यक्तींना विचार की तुझ्या या पापात कोण कोण वाटेकरी आहेत?
"नाम जपले वाल्मीकाने । टोनप्यासी फुटली पाने ।।"
अशाप्रकारे नारदांच्या सहज बोलण्याने वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायणाची अजरामर अशी रचना केली. असो यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. गाय जशी आपल्या वासराला सांभाळत असते ना अगदी त्याच रीतीने संत त्यांच्या सहज वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला माया, प्रेम पुरवितात. त्यांची सेवा भक्ती केल्याने मन प्रसन्न होते. संत आपल्या जीवनात आनंदी आनंद देऊन जातात. अशा महापुरुषांचे नाम जीवनात नेहमी घ्यावे कारण तेेच आपले हित करतात यात काहीही शंका नाही.
- श्रीकृष्ण आणि राजकारण/ Politics of Krishna#
- पंचप्राण आणि त्यांचे कार्य | Panch Pran Vayu and Functions #
- पंचतत्व | पंचमहाभूते | Pancha Tatva | Five Elements #
- भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#
- कर्मयोग
- काही आयुर्वेदिक उपाय Health Tips | आरोग्य संबंधी माहिती
- सहज बोलणे हित उपदेश। करुनि सायास शिकविती ।।
- एकविरा माता माहिती
Usefull information Well written by writer
ReplyDelete