जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

कर्मयोग/Karmyog#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

कर्मयोग/Karmyog#


        आज आपण कर्मयोग या विषयावर नजर टाकणार आहोत. आपल्या कर्मा नुसारच आपली ओळख निर्माण होत असते. मनुष्याने केलेले कर्म त्याची खरी ओळख करून देत असतात. भगवद्गीतेनुसार पाहिले तर कर्मयोगाला विशेष असे महत्त्व आहे. निष्काम बुद्धीने कर्म करीत राहिल्यास आपल्या चित्ताची शुद्धी होते, चित्तशुद्धी झाल्यामुळे अंतरात्मा प्रसन्न होऊन परमेश्वराचा साक्षात्कार होतो व त्या योगाने मोक्षाची प्राप्ती होते. पण अर्थातच परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी कर्मयोगापाठोपाठ भक्तीयोगाचीही जोड असावी लागते. 

भगवद्गीतेत भगवंतानी कर्माचे सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात,

"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥"

        फळाची आसक्ती न ठेवता कर्म करत राहावे हेच कर्मयोगाचे सार आहे. भगवंत म्हणतात मानवा तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाचा नाही. कर्माचा व फळाचा उद्देशही तुझ्या मनात असता कामा नये जे लोक फळाची अपेक्षा मनात धरून सकाम भावनेन कर्म करतात ती लोक आपण होऊनच सापळ्यात पाय ठेवतात. सकाम कर्म करणाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुण्यफळ जरूर मिळते त्यायोगे त्यांना स्वर्ग सुखही लाभतं पण जोपर्यंत त्यांचा पुण्य साठा आहे तोपर्यंतच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की साठवून ठेवलेली गोष्ट आज ना उद्या कधीतरी संपणारच.

        मनुष्य देहाचा कर्म करणे हा स्वभावच आहे. देहधारणार्थ विविध कर्मे करावीच लागतात. आपल्या देहात कर्मेन्द्रिय, ज्ञानेन्द्रिय व मन या त्रिगुणात्मक प्रकृती चे वविकार असल्यामुळे प्रवृत्तीरूप व निवृत्तीरूप कर्म घडत असतात. जसा ज्या देहाचा स्वभाव आहे त्याला अनुसरूनच चांगले कर्म कोणते व वाईट कर्म कोणते हे ठरवता येते. नवीन कर्म करण्याचा अधिकार फक्त मनुष्य जन्मात प्राप्त होतो इतर कोणत्याही जन्मात किंवा योनीत नवीन कर्म करता येत नाही. कर्म न करता तसेच बसल्यास आळस बळावतो आणि आपली कर्म टाळायची प्रवृत्ती झाली की मग तमोगुन वाढतात त्यामुळे नवीन बंधन जन्माला येते. फळाची अपेक्षा न करता कर्म केल्यास सत्कर्म घडून विवेक जन्य सुख मिळते. प्रकाश व ज्ञान मिळून सत्त्वगुणाची वाढ होते. सत्कर्म केल्याने जन्म-मृत्यूचे चक्र माणसाला थांबवता येते.

        जो व्यक्ती आपल्या वाट्याला आलेलं काम कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण करतो तो स्वधर्माचा पालन करतोय असे समजावे. प्रत्येकाला नियतीने ज्याचं त्याचं कर्म ठरवून दिलेल आहे. आपल्या पूर्व कर्मानुसार माणसाचं प्रारब्ध तयार होतं. त्या प्रारब्धाला अनुसरूनच सुख किंवा दुःखाचे भोग तो चालू जन्मात भोगत असतो. जर एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर आपण प्रार्थना करतो की, ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो पण खरे पाहता आत्म्याला चिरशांती प्राप्त होण आपल्याच हातात आहे. माणसाच्या कर्मानुसार जे काही पाप पुण्य तयार होतं त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे भगवंतास शरण जाऊनच सर्व कर्म करावीत.

        कर्मयोगात भगवंतांनी अर्जुनाला कर्माकडे समत्व दृष्टीने बघण्याचा सल्ला दिला आहे. कर्म माणसाला करावंच लागतं पण त्या कर्म करण्यामागील विचार आणि ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा निश्चयात्मक बुद्धी प्राप्त करून शांती मिळव. भगवंत म्हणतात मला या तीनही लोकात काहीही मिळवायचं नाही परंतु तरीही मी कर्म करीतच असतो. मी जर कर्म केलेच नाहीत तर माझे अनुकरण करून मनुष्य निष्क्रिय होईल व त्यातूनच प्रजेचा घात होईल. कर्म करताना भगवंता मध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म करून ती मलाच अर्पण करावीत.

    कर्म करताना आत्मदर्शन कसं होणार? सर्व साधारण माणसाने कर्मयोगी कसे बनावे? यासाठी काही पथ्ये पाळली पाहिजेत ती अशी 

१. कुठलेही काम केलं की "मी केलं" ही जी श्रेय घेण्याची आसक्ती आहे ती जायला हवी. 

२. अनावश्यक गोष्टीचं आकर्षण निर्माण करणारे विचार मनातून काढायला हवेत.

३.  मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवता आले पाहिजे.

तसं पाहिलं तर कर्म आले की, कर्म बंधनात अडकण्याची भीती आलीच पण जर सत्कर्म केली तर ती बंधनकारक होत नसतात. अशा तऱ्हेने कर्म करता करता साधारण मनुष्य ही कर्मयोगी होऊ शकतो. कर्मयोग साधू शकतो. आपल्याला साधलेला कर्मयोग इतरांनाही समजावून त्यांनाही आपल्यासारखेच कर्मयोगी बनविले पाहिजे. हीच खरी कर्मयोगाची महानता आहे.

। कर्मयोग/Karmyog#

। कर्माचा सिद्धांत  । कर्म रहस्य  

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

Follow my YouTube channel

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.