जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

उपासना /ध्यान/ Upasana / Meditation#

.!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!
Secret Meditation

उपासना /ध्यान/ Upasana/Meditation #

          उपासना म्हणजे काय?  उपासना या शब्दाचा अर्थ "पूजा" किंवा "जवळ बसणे" किंवा "उपस्थित राहणे" असा होतो. उपासना हा संस्कृत शब्द असून याचे मूळ "अप" आणि "आसन" असे आहे. आता याचा शब्दशः अर्थ काढला तर "एखाद्याच्या जवळ बसणे" किंवा "आदराने कोणाची तरी वाट पाहणे" असा होतो. उपासना करणे म्हणजे ध्यान करणे. मग ते ध्यान एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल केले जाऊ शकते. ध्यान म्हणजे एकाग्रतेची स्थिती आहे. आपण ज्याचे ध्यान करतो त्यामध्ये आपण लिन होऊन जातो एकरूप होऊन जातो.

           भगवंत प्राप्तीचे साधन म्हणजे उपासना आणि या साधनात गुरुची नितांत गरज असते. एखादी नाव पैल तीरावर नेण्यासाठी जसा नावाडी हवा असतो त्याचप्रमाणे उपासना करून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गुरुची आवश्यकता असते.

        आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी.स्वत:ही, आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तोआपला आत्यंतिक आनंद असतो.उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी.ती  अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते.

हेही वाचा- भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#

            उपासना करत असताना त्यात वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू ,त्यासाठी केला जाणारा विधी, त्यासाठी केलेली प्रत्येक कार्य ही ईश्वराच्या सानिध्याची आणि मधुर मिलनाची अनुभूती घेण्यास मदत करते. जणू काही भगवंतच आपल्या जवळ बसलेला आहे अशी श्रद्धा निर्माण होते. आणि आपण भगवंताला खरोखरच प्रेम दिले आहे अशी भावना निर्माण होते असे जेव्हा आपल्याला जाणू लागते तेव्हा आपली उपासना योग्य मार्गाने होत आहे असे समजावे. आपण ज्याची उपासना करतो तो पूर्ण एकाग्रतेने आपल्याला समजून घेतो किंवा स्वीकारत असतो असा विश्वास ठेवावा.

उपासनेचे फळ मिळेल, ऐहिक भरभराट होईल, दु:खे नाहीशी होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नयेत. कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते. कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल...! त्याचा हिशेब "तो" ठेवेल.

          उपासना वाढवाविशी वाटू लागली, डोळे भरुन येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ स्वप्ने पडू लागली, दैवी अनुभव येऊ लागले, निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे. पुढे पुढे संसारसुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात. व्याकूळ होऊन उपासक सात्त्विक रागाने देवाला विचारतो,.......

        मुका मुक्तेश्वर बोलविला ! पांगुळा कूर्मदास चालविला!

        आंधळा सूरदास डोळस केला ! मजविषयी तुजला काय झाले!

         येथोनी आता कृपा करा ! आपली माया आपण आवरा!

         ते ऐश्र्वर्य न रुचे आम्हा पामरा ! चरणी थारा देईजे!

        अशी अवस्था उपासनेची पराकोटीची उच्च उंची दर्शविते. ती येणे उपासकाच्या व्याकूळतेवर अवलंबून असते.पूर्वकर्मांच्या ओझ्यावर अवलंबून असते. निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करीत रहाणे हेच उत्तम.

         उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये. शक्ती एकच आहे. ती विद्युलतेसारखी आहे. वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि AC मधून गेली तर शांतादुर्गा असते. आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी. कोणाला दत्तमहाराजांचे संन्यासी विरक्त रूप भावते तर कोणाला जगदंबेची भक्त-वत्सलता भावते. कोणाला मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा संयम भावतो तर कोणाला मारुतीरायाची दास्यभक्ती भावते. म्हणून देवादेवात भेदभाव करू नये. कोणताही खाद्यपदार्थ क्षुधाशांती करतोच तसे कोणत्याही देवतेची भक्ती आत्मतृप्ती करतेच.

आकाशात पतितं तोयं । यथा गच्छती सागरं।

सर्व देव नमस्कारं । केशवं प्रती गच्छती।।

 🌹।। श्री  गुरुदेव दत्त *‌‌🌹


No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.